फोंडाघाट महाविद्यालयात महिलांचे शोषण आणि प्रतिबंध विषयावर व्याख्यान संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले महिला विकास कक्ष अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने “महिलांचे शोषण आणि प्रतिबंध” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पल्लवी कदम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपल्या मार्गदर्शनात डॉ. कदम यांनी महिलांचे होणारे शोषण थांबवण्यासाठी महिलांनी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम होणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मानसिक सक्षमता विकसित करण्यासाठी थोर व्यक्तींच्या आत्मचरित्रांचे वाचन उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले. तसेच शारीरिक सक्षमतेसाठी योग्य आहार आणि आरोग्य यांचा समतोल राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लहानपणापासूनच नीतीमूल्यांची जपणूक केली गेल्यास महिलांच्या शोषणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध करता येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पुरंधर नारे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात महिलांच्या सशक्तीकरणासाठी आहाराचे महत्त्व पटवून दिले. महिलांचे शोषण थांबवायचे असल्यास समाजात स्त्री-पुरुष समानता निर्माण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जगदीश राणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विद्या मोदी यांनी केले, तर आभार प्रा. विनोदसिंह पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












