फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या., फोंडाघाट प्रधान कार्यालयास शैक्षणिक भेट देऊन सहकार क्षेत्रातील कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी सांगितले की, या शैक्षणिक भेटीचा मुख्य उद्देश अर्थशास्त्र विषयातील सहकार, वित्तीय संस्था व स्थानिक अर्थव्यवस्था या घटकांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच पतसंस्थांची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना समजावी हा आहे.
पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना पिळणकर तसेच विशेष वसुली अधिकारी मोहन मोदी यांनी विद्यार्थ्यांना पतसंस्थेची कार्यपद्धती सविस्तरपणे समजावून सांगितली. त्यांनी सभासदांना दिल्या जाणाऱ्या विविध आर्थिक सुविधा, भागभांडवल, विविध निधी, ठेवींचे प्रकार, कर्ज वाटप पद्धती, कर्ज वसुली प्रक्रिया आणि थकबाकी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. तसेच पतसंस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम, संस्थेला मिळालेले विविध पुरस्कार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये सहकारी पतसंस्थांची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्रातील व्यवहारिक ज्ञान मिळण्यास मोठी मदत झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे विविध संस्थांची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक आहे. अशा शैक्षणिक भेटींमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते तसेच त्यांना व्यवहारातील अर्थशास्त्र समजण्यास मदत होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी रवीकिरण लाड याने पतसंस्थेचे चेअरमन गणपत वळंजु, सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना पिळणकर तसेच पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या., फोंडाघाट प्रधान कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.














