चमत्कारामागील सत्य समजून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टीकोन – विजय चौकेकर

देवगड (प्रतिनिधी) : समाजातील खोलवर रुजलेल्या नरबळी, अनिष्ट ,अघोरी प्रथा आणि जादूटोणा यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले आहेत . यापासून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहावे आणि जादूटोणा करणाऱ्यां भोंदू लोकांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा केला. हा जादूटोणा विरोधी कायदा आपण सर्वांनी समजून घ्यावा आणि जादूटोणा कायदा समजून घेऊन जीवनात त्याचा अवलंब केलात आणि अलौकिक चमत्कारामागील आणि अकल्पित घटनेमागील सत्य जाणून घेतलात तर तुमच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल .असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले .

जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समिती ( PIMC ) सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथ. जोशी विद्यामंदिर जामसंडे नं १ येथील मुलांसाठी व पालकांसाठी जादूटोणाविरोधी कायद्याचे मार्गदर्शन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयीचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते . त्यावेळी ते विचारमंचावरून बोलत होते .

यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे, जगदीश गोगटे, पूनम पवार बाई, अनघा येरागी बाई, मुख्याध्यापिका सुमेधा तेली, सुदाम जोशी, राजश्री मोंडकर, सूधा घाडी, दिनेश दळवी, रघुनाथ बोडेकर, सचिन बेर्डे, प्रथा बेर्डे, निकीता परब आदी शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते .

जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे सर यांनी मार्गदर्शन करताना जादूटोणा विरोधी कायदा देवधर्माविरोधी नाही मात्र देव धर्माच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्धच असल्याचे सांगितले .तसेच आपण सर्वांनी हा कायदा समजून घ्या.आणि घराघरात जनजागृती करा, लहानांपासून थोरांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि आजच्या व्याख्यानातून जे आपण घेतला ते कायम आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवा आणि कधीच विसरू नका. इतरांना कायदा समजून सांगा. आणि भविष्यात कुठल्याही भोंदू बाबांच्या आहारी जाऊ नका, तुमचं भविष्य तुमच्या हातातच आहे. हे खोलवर मनात रुजवा. हे असेच कार्यक्रम बचत गटातील महिलांना शाळांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनमानसात, गावागावांमध्ये या कायद्याचं व्याख्यान आयोजित करा. असे आवाहन केले .

विजय चौकेकर यांनी या कायद्यामध्ये बारा अनुसूचीच्या आधारावर जादूटोणा करणारे आणि भोंदू लोक आपल्यात अलाौकिक शक्ती आहे म्हणून सांगून कसे चमत्कार करतात आणि हातचलाखी करतात याची विविध प्रात्यक्षिके संतांच्या दाखल्यासहित करून दाखविली . यामध्ये जादूई मडक्यातून अखंड पाणी काढणे , मंत्राने अग्नी पेटविणे , गड्ड्यात भूत उतरविणे , मंत्राने नारळ पेटविणे,नारळातून करणी काढणे , मंत्राने अगबत्तीची दिशा बदलणे , हातातून सोन्याची चैन काढणे , जिभेतून तार आरपार काढणे ,पेटता कापूर खाऊन दाखविणे , इत्यादी प्रात्यक्षिके सहज करून दाखविली . आपल्या गावात असे जर कोणी भोंदू बाबा काही चमत्कार करून दाखवित असल्यास त्याची तक्रार नजिकच्या पोलिस ठाणे येथे तात्काळ करावी असेही आवाहन विजय चौकेकर यांनी केले . आपल्या गावात कोणत्याही प्रकारे कोणाकडूनही जादूटोण्याचे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी असे सांगितले.
सचिन बर्डे सरांनी आभार मानले .

error: Content is protected !!