दोन दिवस बेपत्ता असलेला कामगार सोनाळी नदीपात्रात मृतावस्थेत आढळला

वैभववाडी (प्रतिनिधी) : परराज्यातील कामगाराचा सोनाळी शुक नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राकेश केतन मांझी (वय २५, रा. गोपाळगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव असून तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता.

नापणे येथे सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामासाठी बिहारमधून आलेल्या कामगारांमध्ये राकेश मांझी याचा समावेश होता. तो मागील तीन महिन्यांपासून येथे काम करत होता. बुधवारी वैभववाडी शहरातील आठवडा बाजारासाठी तो गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो नापणे येथील वास्तव्यास परतला नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सहकारी कामगारांनी त्याचा शोध सुरू केला, परंतु तो सापडला नाही.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सोनाळी नदीपात्रात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती येथील पोलीस पाटील राजेंद्र रावराणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या सहकारी कामगारांनी मृतदेहाची ओळख राकेश मांझी अशी पटवली.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश याला दारूचे व्यसन होते. ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!