कसवण मधील 62 वर्षीय जगन्नाथ मेस्त्रीविरोधात गुन्हा दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : पाण्याच्या पाईपवरून रिक्षा नेल्याच्या रागातून रिक्षाचालकासह त्याच्या पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना कणकवली तालुक्यातील कसवण ( सुतारवाडी ) येथे रविवार 29 मार्च रोजी सकाळ च्या सुमारास घडली. रिक्षाचा टायर पाईपवरून गेल्याच्या कारणावरून झालेल्या वादात गणपत जगन्नाथ मेस्त्री ( रा. कसवन ) या 62 वर्षीय वृद्धाने या पती-पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हनुमंत लक्ष्मण मेस्त्री ( वय 52, रा कसवन ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गणपत जगन्नाथ मेस्त्री विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
रविवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हनुमंत लक्ष्मण मेस्त्री हे आपल्या घरून रिक्षा घेऊन कामावर जात होते. यावेळी रस्त्यावर आरोपी गणपत मेस्त्री याने माडाच्या झाडांना पाणी घालण्यासाठी पाईप टाकला होता. हनुमंत यांची रिक्षा या पाईपवरून गेल्यामुळे पाईपचा जॉईंट सुटला. या किरकोळ कारणावरून रागाच्या भरात असलेल्या आरोपीने हनुमंत यांच्या रिक्षेवर लाकडी दांड्याने मारून नुकसान केले.
जेव्हा हनुमंत यांनी गाडी थांबवली, तेव्हा आरोपीने त्याच दांड्याने त्यांना मारहाण करून जखमी केले. पतीचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली आणि “माझ्या पतीला का मारले?” असे विचारले असता, आरोपीने त्यांनाही बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेची नोंद कणकवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार विनोद चव्हाण करत आहेत.











