आरोपींचा ताबा न देण्याचा कणकवली न्यायालयाचा आदेश जिल्हा न्यायालयाने केला रद्द
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कणकवली एसटी स्टँड परिसरात चोरी करताना पकडलेल्या आरोपी साक्षी अरुण बंटू आणि सुनील संतोष तंचाई यांचा ताबा अन्य चोरीच्या गुन्ह्यात न देण्याबाबत चा कणकवली न्यायालयाचा आदेश जिल्हा प्रमुख न्यायाधीश भारुका यांनी रद्द ठरवला आहे. त्यामुळे या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळून सी आर क्रमांक 196 / 2022 चा गुन्हा तपासकाम करणे कणकवली पोलिसांना शक्य होणार आहे. सदर आरोपींचा ताबा पोलिसांना न देण्याबाबत च्या कणकवली न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कणकवली पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक बापू खरात यांनी जिल्हा न्यायालयात रिव्हिजन दाखल केले होते. त्यावर आज सुनावणी झाली. सरकारी अतिरिक्त अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी याबाबत युक्तिवाद करताना आरोपी सराईत गुन्हेगार असून कणकवली एसटी स्टँड परिसरात फिर्यादी महिलेचे दागिने ठेवलेली पर्स चोरीच्या दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासकामी दोन्ही आरोपींचा ताबा पोलिसांना देणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रधान जिल्हा न्यायाधीश भारुका यांनी दोन्ही आरोपींचा ताबा पोलिसांना न देण्याबाबत चा कणकवली न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला. त्यामुळे दोन्ही आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन पोलीस कोठडी मागण्याचा कणकवली पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.












