दोघेही चोरटे सराईत ; उत्तरप्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घेतले ताब्यात
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवलीसह सावंतवाडीत दुकानफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरांच्या जोडीला सिंधुदुर्ग एलसीबी च्या पथकाने अवघ्या 30 तासांत चतुर्भुज केले आहे. एसपी डॉ मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार एलसीबी पीआय प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रकाश कदम, हवालदार राजेंद्र गोसावी हवालदार किरण देसाई, हवालदार आशिष गंगावणे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली असून त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे व जॅक्सन घोंसालवीस यांनी सहकार्य केले. ही कारवाई करण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशन चे रेल्वे पोलिस ए एस आय यादव, हवालदार युवराज पाटील यांचे बहुमोल सहकार्य लाभले. तसेच रोहा पोलीस ठाणे व रोहा रेल्वे पोलीस यांनीही सहकार्य केले. राहुल उर्फ दिवाण ओमप्रकाश तोमर ( वय 36 ) , राजपथ संतराम पाल ( वय 52 ) दोघे रा. भाईंदर पूर्व घोडदेव नाका फुटपाथ ( मूळ रा. उत्तरप्रदेश ) या जोडीला रोहा रायगड येथून ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या हवाली केले. पीएसआय हाडळ यांच्या पथकाने ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी 5 एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास रोहा रायगड येथे केली. कणकवलीत 4 एप्रिल रोजी एकाच रात्रीत 6 दुकाने फोडली होती, तर 5 एप्रिल रोजी सावंतवाडीत 6 दुकाने फोडून धुमाकूळ घातला होता. सलग दोन दिवस झालेल्या या चोऱ्यानी खळबळ उडाली होती. चोरीचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. सिंधुदुर्ग एलसीबी ने अवघ्या 30 तासांत चोरांच्या मुसक्या आवळून चोरीचा पर्दाफाश केला आहे.












