मुंबई गोवा महामार्गावर हुंबरट पावणादेवी मंदिरनजीक दुचाकी अपघात,दोन तरुण जखमी

पत्रकार भगवान लोके यांचे प्रसंगावधान, जखमींना वेळेत मिळाले उपचार

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ येथील पावणादेवी मंदिराजवळ दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. या अपघातात लबिक पटेल (वय २०, रा. हरकुळ खुर्द, ता. कणकवली) आणि केतन वाडे (वय २८, रा. मुंबई) हे दोघेही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळत पडले होते.अपघातानंतर घटनास्थळी काही वाहनचालक व बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र, जखमींच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र होते. याचवेळी असलदे येथून पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके आपल्या कारने कणकवलीकडे येत असताना त्यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ घटनास्थळी थांबून मदतीचा हात दिला.कुठलाही विलंब न करता त्यांनी प्रसंगावधान दाखवून दोन्ही जखमींना रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या कारमध्ये घालून थेट कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथून लबिक पटेल व केतन वाडे हे दोघे एका दुचाकीवरून कणकवलीत येत होते. त्यांच्या समवेत फैयाज शेख व त्यांचा मित्र असे चारजण दोन दुचाकींवरून रविवारी रात्री १० वाजता मुंबईहून कणकवलीकडे निघाले होते. कणकवलीत पोहोचण्यापूर्वीच हुंबरठ पावणादेवी मंदिराजवळील उतारावर त्यातील एका दुचाकीचा भीषण अपघात झाला.

दरम्यान, त्या गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर भगवान लोके यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. पंकज पाटील यांना कळवले .
सध्या दोन्ही जखमींवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. पंकज पाटील यांनी दिली.
या घटनेनंतर जखमींचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले असून, वेळेवर मदत करून जीव वाचविल्याबद्दल त्यांनी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्रकार भगवान लोके यांचे आभार मानले.या घटनेतून समाजात आजही ‘माणुसकी अजून जिवंत आहे’ याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

error: Content is protected !!