श्री बांदेश्वर कलशारोहणाचा दहावा वर्धापनदिन मंगळवारी– विविध धार्मिक कार्यक्रम

बुधवारी ऐतिहासिक नाट्यप्रयोग

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणाचा दहावा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी साजरा होत आहे .यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पुर्वसंध्येला सोमवार असल्याने रात्री साप्ताहिक पालखी सोहळा होणार आहे. मंगळवारी वर्धापनदिन सोहळा व बुधवारी रात्री रायगडाला जेव्हा जाग येते हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. त्यामुळे श्री बांदेश्वर भक्तांसाठी सलग तीन दिवस उत्सवाचा उत्साह आहे.

मंगळवारी वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता गणपती पूजन, देवतांना नारळ विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे घालून होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० ते दुपारी १.०० या वेळेत श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक, श्री देवी भूमिकेच्या मंदिरात श्री सुक्त आवर्तन, तसेच श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवर्तन जप करण्यात येणार आहे.
दुपारी १.३० वाजता महाआरती व महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी ४.०० ते ६.३० या वेळेत स्थानिक मंडळांच्या भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता गुरूवर्य कै. दिगंबर गाड संस्थापित श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्ग, बांदा यांच्यावतीने गुरुवर्य गुरुदास गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग, नाट्यगीत व भावगीतांचा विशेष गायन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
रात्री ९.०० ते १२.०० या वेळेत श्रींचा सवाद्य पालखी सोहळा होणार आहे.

या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून बुधवार दि. १५ रोजी रात्री ९.०० वाजता प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि दूर्वांकुर प्रॉडक्शन दोडामार्ग -सिंधुदुर्ग निर्मित अजरामर ऐतिहासिक नाटक “रायगडाला जेव्हा जाग येते” सादर केले जाणार आहे. तरी सर्व भाविकांनी या मंगल सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थान, बांदा च्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!