इन्सुली डोबाशेळ येथे साक्षात्कार दिन सोहळा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर येथे वैशाख शुद्ध पौर्णिमेला शुक्रवारी संत सोहिरोबानाथांचा साक्षात्कार दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ​यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरतीने सोहळ्याचा आरंभ झाला. त्यानंतर श्रींच्या पादुकांची अभिषेक पुजा तसेच श्री सत्यनारायण महापूजा झाली. दुपारी महाआरती व महाप्रसाद झाला. ​सायंकाळी विविध मंडळांच्या सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात, शेकडो भाविकांच्या उपस्थितीत गजर, नामघोष करीत ​श्री संत सोहिरोबानाथांचा पालखी सोहळा संपन्न झाला व आरती करून प्रसाद वाटण्यात आला. रात्री आजगांवकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा तिरुपती बालाजी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. श्री संत सोहिरोबानाथ सेवा समिती इन्सुली,उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ,इन्सुली व भक्तमंडळीच्यावतीने या सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शवून नाथ दर्शनाचा लाभ घेतला.

error: Content is protected !!