प्रलंबित उड्डाणपूल व अन्य प्रश्न सोडविण्याची आमदार प्रमोद जठार यांची ग्वाही
तळेरे (प्रतिनिधी) : संपूर्ण तळेरे गावाची शान असलेल्या बाजारपेठेचे दोन भाग करून बाधीत करणारे भींत युक्त उड्डाणपूल हटवून त्याठिकाणी टी काॅलमवर आधारित खुले उड्डाणपूल उभारण्यासाठी यासाठी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याने सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे. त्याचबरोबर तळेरे एसटी बसस्थानक हे माॅडर्न बसस्थानक म्हणून विकसित करण्याचा माझा प्रामुख्याने प्रयत्न असणार आहे. तसेच अन्य विविध प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील अशी ग्वाही विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी तळेरेवासीयांना दिली.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांची महाराष्ट्र राज्य विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल नियोजित तळेरे तालुका कृती समिती आणि तळेरे ग्रामपंचायत यांच्या वतीने जाहिर सत्काराचा कार्यक्रम तळेरे एस.टी.स्टॅण्ड समोरील ब्रीजखालील छत्रपती शिवाजी महाराज रंगमंच येथे आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी प्रमोद जठार बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी, डॉ. प्रकाश बावधणकर, नियोजित तळेरे तालुका कृती समिती अध्यक्ष चंद्रकांत (राजू) जठार, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, डॉ. सर्वेश नारकर, महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा संपदा महाडीक आदी उपस्थित होते.
प्रमोद जठार पुढे म्हणाले की, मला पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या संधी चा उपयोग जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितच करणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आणि जिल्ह्यात होऊ घातलेले विकास प्रकल्प सर्वांशी योग्य समन्वय राखून राबविण्यात येतील. सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करणे आवश्यक आहेत ते करण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी गावच्या वतीने सरपंच हनुमंत तळेकर यांनी प्रमोद जठार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिला व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा सौ.संपदा महाडिक तसेच नियोजित तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष राजू जठार, डॉ.मिलिंद कुलकर्णी, व्यापारी संघटनेच्या वतीने अमोल सोरप, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजकुमार तळेकर तसेच अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व अनेक हितचिंतकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला चंद्रकांत (राजू) जठार यांनी प्रास्ताविक आणि संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर डॉ.मिलिंद कुलकर्णी, डाॅ.प्रकाश बावधणकर यांनी तळेरे गावच्या विकासाला मारक ठरणारी बंदिस्त भिंत हटविण्यात यावी अशी आग्रही मागणी केली. या प्रसंगी तळेरे गावातील ग्रामस्थ, गावातील विविध सामाजिक संस्था, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












