सलग तिसऱ्या दिवशी वैभववाडीत वादळी पावसाचा तडाखा; ४१ घरांची छपरे उडाली

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत चक्रीवादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल ४१ घरांची छपरे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मांगवली, तिथवली, करूळ, वेंगसर परिसरातही अनेक घरांचे नुकसान झाले असून महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे मोडून पडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती तर वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे काही गाव वीजपुरवठा खंडित झाला होता.

शनिवारी दुपारनंतर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. आखवणे भोम पुनर्वसन गावठाणात चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वादळात महेंद्र धोंडू पांचाळ, शांताराम बापू पांचाळ, रमेश गोविंद पडीलकर, सुलोचना नागप, मोतीराम विष्णू नागप, राजेश शंकर कांबळे, विलास बाळकृष्ण नगर, विजय पांडुरंग सुतार, मारुती दिनकर सुतार, अनंत पांडुरंग सुतार, रमेश रामचंद्र सुतार, शिवाजी मधुकर परब, रघुनाथ अनाथ नगर, बाबल्या तुकाराम सुतार, कृष्णा तुकाराम कांबळे, रुपेश नारायण कांबळे, दत्ताराम बाळकृष्ण नागपुर यांच्यासह अन्य नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
सायंकाळी उशिरापर्यंत महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू होते. पुनर्वसन गावठाण परिसरातील भूखंडांलगत लावण्यात आलेली आंबा व काजूची झाडेही वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडली असून धरणग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान मांगवली येथील प्रसाद पांडुरंग जावडेकर, विजय यशवंत जावडेकर, सावळाराम कांबळे,गंगाराम कांबळे,सत्यवान आप्पा कांबळे, संतोष सखाराम कांबळे, शरद शांताराम कांबळे, यांच्या घराचे नुकसान झाले असून वीज वाहिन्यांवर व रस्त्यावर झाडे मोडून पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.तर तिथवली येथील नोमान हारून इसफ तसेच वेंगसर येथील मधुकर गुरव यांच्या घरांचेही वादळी वारा व पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कुंभवडे येथे वीज वाहिन्यावर झाड पडल्यामुळे वीज वीज वाहिनीवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

सातबारा नसल्याने नुकसानभरपाईत अडचणी पुनर्वसन गावठाणातील अनेक धरणग्रस्तांनी रिकाम्या भूखंडांमध्ये आंबा, काजू आदी फळझाडांची लागवड केली आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे ही झाडे जमीनदोस्त झाली आहेत. संबंधित भूखंडांचे सातबारा अद्याप धरणग्रस्तांच्या नावावर नसल्याने फळझाडांच्या नुकसानभरपाईसाठी तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!