पदाधिकाऱ्यांच्या दणक्यानंतर महामार्ग प्राधिकरण जागे; वैभववाडीत साईट पट्टीच्या कामाला वेग..

अपूर्ण कामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर; जोड रस्त्यांची कामेही लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन…

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या दणक्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अखेर खडबडून जागे झाले असून वैभववाडी शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या साईट पट्टीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तळेरे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असले तरी अनेक ठिकाणी कामे अद्याप अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.

यावेळी अर्धवट स्थितीत असलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत नागरिकांच्या समस्यांची जाणीव करून देण्यात आली. बैठकीस सभापती सिद्धेश रावराणे, वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, मुख्याधिकारी प्रतीक थोरात नगरसेवक रणजीत तावडे आशिष रावराणे आदी उपस्थित होते. तालुक्यातील एडगाव, कोकिसरे, नाधवडे व करूळ येथील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या जोड रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावरून जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंता वृषाली पाटील यांनी संबंधित जोड रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करून ही कामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शुक्रवारी वैभववाडी शहरातील रस्त्यांच्या साईट पट्टीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!