डॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज फेटाळला

ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

कणकवली (प्रतिनिधी) : बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या हाय प्रोफाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इस्टेट एजंट व्यंकटेश बाबू याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठीचा कणकवली पोलिसांचा रिव्हीजन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळला आहे. कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला सुनावलेली न्यायालयीन कोठडी रद्द करून त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी, यासाठी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दाखल केलेला रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी आरोपीच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

बेंगलोरचे डॉ. श्रीनिवास रेड्डी यांना गोव्यातील हॉटेलमधून मुंबईला नेण्याच्या बहाण्याने आरोपी मधुसूदन टोकला, व्यंकटेश बाबू व इतरांनी स्विफ्ट गाडीतून नेले होते. प्रवासादरम्यान साळीस्ते येथे गाडीतच त्यांची हत्या करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. या गुन्ह्यात मधुसूदन टोकला, नरसिंह मूर्ति, वर्धन के. एन., सुभाष सुब्बारायापा एस. या आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी व्यंकटेश बाबू हा दीर्घकाळ फरार होता. बेंगलोर पोलिसांनी त्याला अन्य एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर कणकवली पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता.

आरोपी व्यंकटेश बाबूला १५ एप्रिल रोजी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तपास अपूर्ण असल्याचे सांगत आणि गुन्ह्यातील महत्त्वाचे दुवे शोधायचे असल्याचे नमूद करत पुन्हा ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने ती फेटाळून आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.

कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्जाद्वारे आव्हान दिले होते. त्यावरील सुनावणीत आरोपी व्यंकटेश बाबूच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायालयाने कणकवली पोलिसांचा रिव्हिजन अर्ज फेटाळून लावला.

error: Content is protected !!