बांदा येथे ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ उत्साहात साजरा; डेंग्यू मुक्तीसाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन

बांदा (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा, येथे 16 मे 2026 रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ विविध जनजागृतीपर उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माननीय अध्यक्ष प्रमोद कामत हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी, सावंतवाडी डॉ. रमेश सुबराव कर्तस्कर माननीय पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, बांदा गावच्या सरपंच प्रियंका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, मा. ग्रामपंचायत सदस्य आत्माराम गावडे आणि बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे माननीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष प्रमोद कामत यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, डेंग्यू हा डासांमुळे होणारा गंभीर आजार असून, केवळ शासकीय यंत्रणेर अवलंबून न राहता लोकसहभागातूनच याचे उच्चाटन शक्य आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे कोरडा दिवस पाळणे आवश्यक आहे. डेंग्यू आजार होऊ नये यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी, असे आवाहन त्यांनी केले. याचवेळी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाच्या सक्षमीकरणासाठी मा. अध्यक्ष कामत यांनी येथील आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. यामध्ये औषध पुरवठा, आरोग्य केंद्राचे बांधकाम, दुरुस्ती अनुदान तसेच इतर प्रलंबित बाबींची पूर्तता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तातडीने केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मा. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी डेंग्यू आजाराबत सविस्तर माहिती दिली. एडिस ईजिप्ती हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे घरात किंवा छतावर कुठेही पाणी साचू देऊ नका, असे सांगत ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसल्यास तातडीने मोफत तपासणी व उपचार करून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कार्यक्रमात मा. सरपंच प्रियंका नाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवेकरीता अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या विशेष प्रयत्नातून परिचर व सफाई गार पद उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्षांचे विशेष आभार मानले.

तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी गप्पी मासे, डास, अळ्या, डास प्रतिबंधात्मक द्रावण इत्यादींचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. मान्यवरांकडून व ग्रामस्थांकडून सदर प्रदर्शनाची पाहणी करून माहिती घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक शंकर परब यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. आ. केंद्र बांदाचे आरोग्य सहाय्यक साईनाथ वेटे यांनी मानले.

या कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी अरुण गवस, तसेच बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी सुप्रिया रंगरसूर, सीमा ठाकूर, रुपाली म्हाडगुत, नरेंद्र बांदलकर, आशा स्वयंसेविका आणि बांदा परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!