कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित सौंदर्यात रूपांतर…!

कणकवली नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम…!

कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायतीमार्फत शहरात दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी GVP Point (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने नगरपंचायतीने अशा ठिकाणांचे निर्मूलन करून त्यांचे सुशोभीकरण करण्याचा अभिनव निर्णय घेतला.

या उपक्रमांतर्गत शिवाजीनगर येथील अरोमा हॉटेलसमोरील GVP Point वरील कचरा पूर्णपणे हटवून त्या जागेचे आकर्षक रूपांतर करण्यात आले आहे. मा. मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या पर्यावरणपूरक विचाराला मूर्त स्वरूप देत जुन्या टायरांचा कुंड्यांप्रमाणे वापर करण्यात आला. या कुंड्यांमध्ये विविध शोभिवंत व पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात आली आहे.याशिवाय नागरिकांसाठी बैठक व्यवस्था उभारून परिसराचे सौंदर्य खुलविण्यात आले आहे. पूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या या जागेचे आता हरित आणि स्वच्छ सार्वजनिक स्थळात रूपांतर झाले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्याच्या दृष्टीने कणकवली नगरपंचायतीचा हा उपक्रम शहरासाठी प्रेरणादायी ठरत आहे. नगरपंचायतीने नागरिकांना रस्त्यावर कचरा न टाकता घरगुती कचरा नियमितपणे घंटागाडीमार्फतच देण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!