एम बी बी एस डॉक्टरांची पहीली बॅच
ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा एमबीबीएसचा निकाल जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल ९८.९४ टक्के लागला आहे. ९५ पैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयात प्रथम गायीत्री शिवराम शिर्के ७४.२२ टक्के, द्वितीय मिथ जयेश जोशी ७३.२९ टक्के, तृतीय सानिका भाऊसाहेब चौगुर्ले ७१.५० टक्के याप्रमाणे गुण मिळवित यश संपादन केले आहे. यशश्वी विद्यार्थ्याचे वैदयकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी अभिनंदन केले आहे.
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी महाविद्यालयाच्या पहिल्या एमबीबीएस बॅचने केली आहे. २०२१ मध्ये शासनाने जिल्हा रुग्णालयाचे रूपांतर करून सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. त्यानंतर पहिली बॅच २०२२ मध्ये सुरू झाली. चार साडेचार वर्षानंतर पहीली बॅच एम बी बी एस बनून बाहेर पडली आहे. विविध अडचणी, मर्यादित संसाधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश कौतुकास्पद मानले जात आहे. या यशामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच ९४ नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांच्यासह सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी मोठी मेहनत घेतली. शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आरोग्य यंत्रणेतील विविध प्रश्नांमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हा आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. महाविद्यालयातील पहिली एमबीबीएस बॅच यशस्वीपणे पूर्ण झाली असून लवकरच विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ पार पडणार आहे.
या निकालामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित झाली असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
गोपनीयतेमुळे चर्चेला उधाण
महाविद्यालयाच्या पहिल्याच एमबीबीएस बॅचने ९८.९४ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली असतानाही या यशाची अधिकृत माहिती प्रशासनाकडून व्यापकपणे जाहीर करण्यात आलेली नाही. जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असलेल्या या यशाची माहिती अधिक ठळकपणे नागरिकांसमोर यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.












