खड्ड्यामुळे रिक्षा पलटी; संतप्त ग्रामस्थांचा वैभववाडी-नावळे मार्गावर रस्तारोको

तिघेजण गंभीर जखमी; नगरपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप, दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी-नावळे रस्त्यावरील धोकादायक वळणावर पडलेल्या खड्ड्यामुळे रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. हा रस्ता वैभववाडी नगरपंचायतीच्या ताब्यात असल्याने अपघातानंतर ग्रामस्थांनी या मार्गावर रस्तारोको करून नगरपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगरपंचायतीने खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच हा चौथा गंभीर अपघात झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर पुढील दोन दिवसात खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करून देण्याचे आश्वासन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांनी दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. या रस्तारोको मुळे वैभववाडी – नावळे व शिराळे कडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहणांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या घटने दरम्यान उद्धट उत्तरे देणारे नगरपंचायतीचे अभियंता विशाल होडावडेकर व सभापती सिद्धेश रावराणे यांच्यात बाचाबाची झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

नगरपंचायत मालकीच्या वैभववाडी – नावळे मार्गावरील कोंडवाडी येथे शुक्रवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रिक्षा पलटी होऊन अपघात झाला होता. तीव्र उतार,धोकादायक वळण आणि वळणावर रस्त्याला पडलेले मोठं मोठे खड्डे यामुळे रिक्षाने तीन पलट्या खाल्ल्या. त्यामुळे रिक्षा चालकासह आतील तीन पैकी दोन अशा तिघांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची स्थिती बघून जमलेल्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्तारोको आंदोलनाचा निर्णय घेतला. शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संभाजी रावराणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी नावळे मार्ग ग्रामस्थांनी रोखून धरित आंदोलन केले. या अपघात व आंदोलनाची माहिती मिळताच सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती सांची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सभापती रावराणे यांनी नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थांनी नगरपंचायत प्रशासन आणि ठेकेदार यांच्यावर गंभीर आरोप केले. केवळ पैसे लाटण्यासाठी नगरपंचायत आहे का असा सवाल केला. या अपघाताला केवळ नगरपंचायतीचा दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या दोन महिन्यात हा चौथा अपघात असून अजून तुम्ही किती लोक मारणार आहात असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी स्वप्निल रावराणे गुरुनाथ राणे, प्रकाश राणे, संतोष गुरव, संतोष रावराणे,बाबू रावराणे आदी रिक्षा चालक टेम्पो चालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपंचायतीचे अभियंता विशाल होडावडेकर यांच्या उद्धट वर्तणुकीमुळे ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. ज्या अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्यांशी कसे बोलावे याची सभ्यता माहित नसेल तर असे अधिकारी हवेत कशाला असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. या अधिकाऱ्यावर निलंबणाची कारवाई करा अशी मागणी सभापती रावराणे यांनी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्याकडे केली. उबाठा सेनेचे स्थानिक पदाधिकारी स्वप्नील रावराणे यांनी मार्च मध्ये नगरपंचायतकडे खड्डे बुजविण्याची मागणी निवेदणाद्वारे केली होती. मात्र जून महिना आला तरी हे निवेदन नगरध्यक्षा रावराणे यांच्यापर्यंत गेलेच नसल्याचे खुद्द नगराध्यक्षांनी सांगितले. ग्रामस्थांच्या संतप्त भावनांचा विचार करून दोन दिवसांत खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन नगराध्यक्षा रावराणे व सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. दोन दिवसात खड्डे बुजविले नाहीत तर सोमवारी पुन्हा रास्तारोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

error: Content is protected !!