वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तटंचाईच्या पार्श्वभूमीवर वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सलग ३९ व्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.
वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस), लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. तसेच सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळ, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस श्री देव जैतिराश्रीत संस्था बहुउद्देशीय सभागृह) येथे हे शिबिर पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मोळके, डॉ. सानिया खान, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, लोकमान्य बँकेच्या गौरी जुवेकर ,कल्पेश माडकर, प्रकाश मालवणकर तसेच सिद्धार्थ कलाविष्कारचे साईराम तुळसकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कृषी महाविद्यालय, मुळदे येथील तुळस निवासी विद्यार्थ्यांनी ‘रावे’ उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. युवकांमध्ये सामाजिक जाणीव आणि रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा हा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
यावेळी बोलताना पंचायत समिती सभापती शंकर घारे म्हणाले, “वेताळ प्रतिष्ठानने गेली अनेक वर्षे रक्तदान, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सलग ३९ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे ही कौतुकास्पद बाब आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी.”
भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई म्हणाले, “वेताळ प्रतिष्ठानने समाजहिताचे विविध उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. रक्तदानासारखा उपक्रम सातत्याने राबविण्यामागील संस्थेची सामाजिक तळमळ निश्चितच प्रेरणादायी आहे. युवकांनी मोठ्या प्रमाणात अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजकार्यात योगदान द्यावे.”
जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ म्हणाल्या, “वेताळ प्रतिष्ठानचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. संस्थेची सामाजिक बांधिलकी आणि सातत्यपूर्ण सेवा निश्चितच अभिनंदनीय असून अशा उपक्रमांना समाजाने भरभरून प्रतिसाद द्यावा.”
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. शिबिरात युवक, महिला तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.वेताळ प्रतिष्ठानतर्फे सलग ३९ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे महेश राऊळ, मंगेश सावंत, सदगुरू सावंत, माधव तुळसकर, विवेक तिरोडकर, रोहन राऊळ, रोहित गडेकर, प्रदीप परुळकर, प्रसाद भणगे, सुधीर चुडजी, सानिया वराडकर, सुहास सावंत, नाना सावळ, सदानंद वराडकर, प्रज्वल परुळकर, नाना राऊळ, वैष्णवी परुळकर, प्रांजल सावंत, भूमी परुळकर, भक्ती भणगे, प्राची गोरे, भार्गवी परुळकर तसेच सिद्धार्थ कलाविष्कार युवक मंडळाचे धीरज तुळसकर, राज तुळसकर, अक्षय तुळसकर, शाम तुळसकर, निलेश तुळसकर, कृष्णा तुळसकर आदींनी मेहनत घेतली.
रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते, मान्यवर, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आयोजकांनी आभार मानले. लोकमान्य बँक कडून सर्व रक्तदात्याना पर्यावरण पुरक किट देण्यात आले.












