विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी शाळेचा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

पंचायत समिती सदस्या साधना नकाशे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, कोलगेट व टूथब्रश यांचे वाटप

विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल करावे; पालकांनी शिक्षणाबाबत जागरूक राहावे : बाप्पी मांजरेकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : आज शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा प्रारंभ झाला. विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी शाळेचा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात प्रभात फेरीने प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. पंचायत समिती सदस्या साधना सुधीर नकाशे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके,मोफत गणवेश आणि कोलगेट व टूथब्रश यांचे वाटप करण्यात आले. सर्वप्रथम इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. उपस्थित मान्यवर, शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका,सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी पुष्पवर्षाव करून नवोदित पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे चेअरमन तथा वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती बाप्पी मांजरेकर होते. या कार्यक्रमासाठी सन्माननीय पंचायत समिती सदस्या साधना नकाशे. दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर, सिंधुदुर्ग जि.प.चे माजी सदस्य सुधीर नकाशे, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. साधना नकाशे यांनी आपण शिक्षण घेऊन खूप मोठे होऊ शकतो असे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा असे सांगितले. शाळेच्या गौरवशाली परंपरेबद्दल बंड्या मांजरेकर यांनी आपले विचार मांडून ग्रामस्थ व शिक्षक यांनी अतिशय मेहनत घेऊन या शाळेचे नाव तालुका, जिल्हापर्यंतच नव्हे तर राज्यस्तरीय स्पर्धेतून सुद्धा टिकवण्याचं काम केले आहे. याबद्दल गौरवोद्गार काढले. यावर्षीही नवोदय आणि स्कॉलरशिप मध्ये शाळेने आपले यश टिकवून ठेवले त्याबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. सुधीर नकाशे यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेमध्ये शिकलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी कष्टाची गरज असते आणि अभ्यास हेच तुमचे कष्ट आहेत असे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये बाप्पी मांजरेकर यांनी गेल्या वर्षाचा संपूर्ण आढावा घेऊन पालकांना आपण शाळेसाठी जागरूक राहावे असे आवाहन करून विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा आणि शासनाने दिलेल्या सुविधांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून शाळेचे नाव उज्वल करावे माझ्या शुभेच्छा आपल्या पाठीशी नियमित राहतील असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा गावचे उपसरपंच गोपाळ उर्फ प्रफुल्ल कोकाटे,माजी सरपंच शैलजा पांचाळ शाळा समितीचे व्हाइस चेअरमन नाना बंड, चंद्रशेखर उर्फ बाळा जठार, नाधवडे गावचे पोलीस पाटील संजय पेडणेकर, वल्लभ शिंदे ,अनंत पाटणकर ,पूजा गायकवाड , श्रुती आयरे,अपूर्वा सुतार ,ज्योत्स्ना नानारकर ,शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे,पदवीधर शिक्षक पंढरीनाथ सावंत ,संदिप कोळेकर, सुजाता कुडतरकर अंगणवाडी सेविका विज्ञानी शिंदे, अमृता लेले आदी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सावंत यांनी तर आभार प्रदर्शन कोळेकर सर यांनी केले.

error: Content is protected !!