स्मार्ट मीटरच्या संदेशांमुळे वैभववाडीत संभ्रम; शिवसेना ठाकरे गटाचा महावितरणला जाब

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील वीज ग्राहकांच्या मोबाईलवर स्मार्ट मीटर बसविण्याबाबतचे संदेश येऊ लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले.

गेल्या दोन दिवसांपासून अनेक ग्राहकांना “पुढील ४८ तासांत विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे” असे संदेश प्राप्त होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये विविध शंका निर्माण झाल्या असून स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी संबंधित संदेश केंद्रीय कार्यालयातून पाठविण्यात आले असून स्थानिक स्तरावर मीटर बदलाबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी दिली.
मात्र, ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना तीव्र विरोध करेल, असा स्पष्ट इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करून पारदर्शक माहिती देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

याचवेळी महावितरणच्या इतर कामकाजाबाबतही शिवसेनेने महत्त्वाच्या सूचना केल्या. नवीन वीज खांब उभारताना संबंधित जमीनमालकाची पूर्वपरवानगी घेणे, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेणे तसेच शेतीचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली. शेतातील पायवाटा बंद होणार नाहीत आणि शेतीच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. या शिष्टमंडळात शिवसेना तालुका सचिव गुलजार काझी, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, महिला तालुका संघटक दिव्या पाचकुडे, स्वप्नील रावराणे, ओमकार इस्वलकर यांच्यासह अन्य शिवसैनिक सहभागी झाले होते.
“ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारा कोणताही निर्णय सहन केला जाणार नाही. नागरिकांच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास तयार आहे,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.

error: Content is protected !!