बांदा (प्रतिनिधी) : मडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून व आरती ओवाळून स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन त्यांच्या शालेय जीवनाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांचा परिचय विद्यार्थ्यांना व पालकांना करून देण्यात आला. विद्यार्थी आणि पालकांसाठी आकर्षक सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे उपस्थितांनी आनंदाने छायाचित्रे काढून प्रवेशोत्सवाच्या आठवणी जपल्या.
कार्यक्रमास पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य भिकाजी धुरी, सुरेश गावडे, प्रवीण परब, मुख्याध्यापिका नीती साळगावकर तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.










