प्रा. डॉ. नामदेव गवळी यांचे निधन; शैक्षणिक व साहित्य क्षेत्रावर शोककळा

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख, ज्येष्ठ कवी-साहित्यिक तथा उपप्राचार्य प्रा. डॉ. नामदेव विठ्ठल गवळी (वय ५८) यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी ते घराबाहेर पडले असता त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे हे त्यांचे मूळ गाव होते. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजे १९९२ पासून ते महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गेली अनेक वर्षे त्यांनी उपप्राचार्य तसेच प्रभारी प्राचार्य या जबाबदाऱ्याही यशस्वीपणे सांभाळल्या. विद्यार्थीप्रिय, शांत, संयमी, मृदूभाषी आणि नेहमी हसतमुख असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. ज्ञानदानाबरोबरच साहित्य व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचा ‘भातालय ’ हा कवितासंग्रह विशेष गाजला. या काव्यसंग्रहाला साहित्य मराठी साहित्य परिषद, मुंबई विद्यापीठ आदी नामांकित संस्थांकडून गौरव प्राप्त झाला होता. त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या तसेच विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष बी.ए. अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. मालवणी लोककला आणि मालवणी साहित्याच्या जतन व संवर्धनासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. साहित्य, शिक्षण आणि संस्कृती या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत. रोटरी क्लबचे ते सक्रिय सदस्य होते. त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी कारिवडे (ता. सावंतवाडी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील शिक्षक, अभ्यासू साहित्यिक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!