सिंधुदुर्गातील शाळा ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रात; सीईओ रवींद्र खेबुडकर यांचे आदेश

ओरोस (प्रतिनिधी) : अल निनोच्या प्रभावामुळे लांबलेला पाऊस आणि वाढलेले तापमान त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जाणार आहेत. तूर्तास १९ ते ३० जून पर्यंत सकाळी ७ ते ११.१५ या वेळेत शाळा कामकाज करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आहेत.

यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे तसेच पावसाळा लांबल्याने वातावरणातील बदल अधिक तीव्र झाले असून जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता वाढल्याचे प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार असून वाढत्या उष्णतेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!