एसआयटी कडून सिंधुदुर्गातील २४५ शिक्षकांची तपासणी सुरू

शिक्षण समिती सभेत धक्कादायक बाब उघड

ओरोस (प्रतिनिधी) : विशेष तपासणी पथकाद्वारे (एसआयटी) जिल्ह्यातील २४५ शिक्षकांची तपासणी सुरू आहे. शिक्षण विभागाकडून एवढ्या शिक्षकांची कागदपत्रे एसआयटीने मागवून घेतली असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत उघड झाली आहे. ही चौकशी कोणत्या कारणासाठी होत असून चौकशी सुरू असलेल्या शिक्षकांची यादी पुढील सभेत सादर करावी, अशी मागणी यावेळी सदस्य प्रमोद रावराणे यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची जून महिन्याची मासिक सभा गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सभा सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी फारुकी अहमदी, सदस्य प्रमोद रावराणे, रामा गवस, विक्रांत सावंत, नितीन राऊळ, यज्ञा साळगावकर, सुजाता पडवळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी रावराणे यांनी जिल्ह्यातील काही शिक्षकांची एसआयटी चौकशी सुरू आहे का ? असा प्रश्न केला. मात्र, त्यावर माध्यमिक विभागाच्या प्रशासनाने विसंगत उत्तरे देण्यास सुरुवात केली. ही चौकशी गोपनीय आहे. आमच्याकडून माहिती मागवून घेतली आहे, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु सभागृहाने तुमच्याकडून माहिती मागवली आहे म्हणजे त्याची नावे आणि आकडेवारी तुमच्याजवळ असणार. त्यामुळे ती आकडेवारी द्या, असे सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी २४५ शिक्षकांची एसआयटी द्वारे माहिती मागवली गेली आहे. त्यांची नावे पुढील सभेत देतो, असे सांगितले.

error: Content is protected !!