मालवणी लोककलेला आधुनिक रंगभूमीची जोड; ‘व्हाया समांतर रंगभूमी’ची मुहूर्तमेढ
कणकवली (प्रतिनिधी) : सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. दशावतार लोककलासह विविध कला नृत्य, नाट्य आदींनी आपण देशविदेशात पोहोचलो आहोत, मात्र लोकाश्रय मिळालेल्या या सर्व लोककलांना राजाश्रय मिळवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. सर्वसामान्य रसिक कल्पनाही करू शकणार नाही अशी संहिता घेऊन लवकरच विजय चव्हाण,अक्षरसिंधु च्या माध्यमातून रंगभूमीवर अवतरणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य जाणकार व मान्यवर कलाकार, पत्रकार, समीक्षक यांची सहविचार चर्चा या अनुषंगाने कास्टिंग, प्रात्यक्षिक, संहिता पूजन अशा कार्यशाळेचे आयोजन कणकवली कलमठ येथे प्रतीक्षा चव्हाण यांचे घरी करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते नाट्य क्षेत्रातील नामांकित दिग्दर्शक गोलपिठा फेम मिलिंद पेडणेकर (मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी जेष्ठ पत्रकार समीक्षक अशोक करंबेळकर सेवानिवृत्त माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, माजी सेवानिवृत्त अधिकारी तथा सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय चव्हाण, सीए अमोल खानोलकर, ज्येष्ठ कलाकार प्रा हरीभाऊ भिसे, संजय राणे, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, गायक मयूर गवळी, समीक्षक निलेश गावकर, दशावतारातील अभ्यासक प्रा वैभव खानोलकर, पुनम सावंत, संतोष टक्के, प्रमोद कोयंडे, पूजा राणे, अमर पवार, शेखर कल्याणकर, दीपक जानकर, किरण कदम, प्रभाकर चव्हाण, लखन चव्हाण, अमोल तांबे संपूर्ण सिंधुदुर्ग सह गोव्यातील कलाकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष पारकर म्हणाले, दशावतार लोककला त्याला आधुनिक रंगभूमीची जोड व्हाया समांतर रंगभूमी ही सिने नाट्य अभिनेते विजय चव्हाण यांची संहिता तर डॉक्टर शरण चव्हाण यांची मूळ संकल्पना आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने कणकवलीच्या अक्षरसिंधुने जिल्हा राज्यपातळीवर कला क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. जिल्ह्यातील दशावतार, नाट्य, नृत्य, एकांकिका यामध्ये प्रत्येक कलावंतांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे असे सांगितले. जेष्ठ पत्रकार समीक्षक अशोक करंबेळकर म्हणाले, सांस्कृतिक क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याची त्यातही कणकवलीची ओळख वेगळी आहे. आता यात भर पडत आहे ती, रंगकर्मी विजय चव्हाण यांच्या नवीन धाडसाची ! सर्वसामान्य रसिक कल्पनाही करू शकणार नाही असा विषय घेऊन लवकरच विजय चव्हाण रंगभूमीवर अवतरणार आहेत. गांव, तालुका, जिल्हा, राज्य याहीपलिकडे एक ग्लोबल स्वप्न विजय चव्हाण यांनी पाहिले व त्याबाबतीत लोक रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, समांतर रंगभूमी यातील प्रत्यक्ष कार्य व अनुभवाच्या जोरावर केलेल्या अभ्यासाची परीक्षा रसिक परिक्षकांसमोर लवकरच ते देणार आहेत. या परीक्षेतील यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
शासनाच्या नाट्य क्षेत्रातील विविध पुरस्काराने सन्मानित झालेले या नवीन संहिताचे दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांनी ही संहिता कोकणचा दशावतार फॉर्म मध्ये असल्याने राज्यनाट्य स्पर्धेच्या प्रयोगानंतर शुभारंभासह अनेक प्रयोग शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाराष्ट्र भर आयोजित करणेबाबत विचारणा झाल्याचे सांगितले. संहिताचे लेखक नाट्यकर्मी विजय चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात विविध लोककला ,लोकनृत्य आहेत या कलेला आणि माझ्या जिल्ह्यातील कलाकारांना जिल्हा राज्यासह देश जागतिक पातळीवर यश व संधी मिळावे याच उद्देशाने आमची वाटचाल आहे. लोकरंगभूमीला आधुनिक रंगभूमीची जोड कशी देता येईल आणि व्हाया समांतर रंगभूमी ही नाट्यकृती तयार करून ती देश राज्य पातळीवर कशी जाईल यासाठी आमचा प्रयत्न आहे असे सांगितले. प्रा वैभव खानोलकर,मृणाल सावंत, पुनम सावंत, प्रमोद कोयंडे, संतोष टक्के यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरसिंधुचे जेष्ठ कलाकार संजय राणे यांनी केले. आभार मयूर चव्हाण यांनी मानले. उद्घाटनानंतर जिल्ह्यातील नामांकित दशावतार कलाकारांनी आपली कला सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
(जिल्ह्यातून निवडक कलाकार म्हणजेच सब कुछ मालवणी मातीचा गंध.
लोकरंगभूमी.. ते.. आधुनिक रंगभूमी.. व्हाया.. समांतर रंगभूमी ची सांगड घालताना आपल्या सर्वांची आदर्श म्हणजे महाभारत यातील डार्क पात्रांची व्हाईट बाजू या नावीन्यपूर्ण संहितेतून प्रेक्षक आणि विचारवंतांना पाहायला मिळणार आहे. मालवणी मातीची लोककला,दशावताराचा फॉर्म मधून सादर होणाऱ्या या ड्रीम संहितेचा लेखक विजय चव्हाण, दिग्दर्शन मिलिंद पेडणेकर आणि संपूर्ण जिल्ह्यातून निवडक कलाकार म्हणजेच सब कुछ मालवणी मातीचा गंध असणार आहे.)











