बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला म.न.पा. कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा- अशोक जाधव

मागण्या न मानल्यास महापालिका कर्मचारीही उतरणार आंदोलनात : संघर्ष समितीचा इशारा

खारेपाटण (प्रतिनिधी) : बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी आज पुकारलेल्या असहकार आंदोलनाला म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी,अभियंते व अधिकारीही या आंदोलनात उतरतील, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. बेस्ट कामगार कृती समितीच्या वतीने बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली असून, या आंदोलनात सर्व बेस्ट कर्मचारी उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समितीची तातडीची बैठक पार पडली. बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

“बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असून महापालिका प्रशासनाने त्या त्वरित मान्य कराव्यात. अन्यथा महापालिकेतील सर्व संघटना एकत्र येऊन बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरतील,” असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक जाधव व निमंत्रक वामन कविस्कर यांनी संयुक्त पत्रकाद्वारे दिला आहे. या पत्रकावर म्युनिसिपल मजदूर युनियनचे वामन कविस्कर, म्युनिसिपल कामगार-कर्मचारी सेनेचे बाबा कदम, म्युनिसिपल मजदूर संघाचे रमाकांत बने, रोनाक बालाडे, प्रकाश जाधव, संजय कापसे, सतीश राजमुळे, दिपक जाधव, इंजिनिअर्स असोसिएशनचे रमेश धुमाळे-देसमुख, नर्सेस अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनचे विशाल कांबळे, हिंदुस्थान कर्मचारी संघाचे दिवाकर दलव्ही आदी संघटनांच्या नेत्यांच्या सह्या आहेत. तर बेस्टच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीसह महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशोक जाधव

error: Content is protected !!