पं. स. च्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : सभापती सिद्धेश रावराणे यांची माहिती
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती वैभवाडीच्या वतीने आज ग्रंथालय सुरु करण्यात आले. तसेच पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांच्या शुभहस्ते ग्रंथालय कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, सदस्य रिद्धी सुतार, पं. स. सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी श्रीमती माने, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, संतोष टक्के व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच पंचायत समिती वैभववाडी यांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 जून रोजी लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप, भजनी कलाकारांना मंजुरी आदेश वाटप, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील सहभागी ग्रामपंचायतिचा सन्मान, अमृत महा आवास अभियाना मध्ये विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. 2 या ग्रामपंचायतीचा सन्मान तसेच सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या करुळ ग्रामपंचायतीचा सन्मान, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या तीनही शाळांचा सन्मान, बाल स्नेही पंचायत अभियानामध्ये जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या कुसूर ग्रामपंचायतीचा व आदिशक्ती टीमचा सन्मान करण्यात येणार आहे. 22 जून रोजी उत्कृष्ट काम केलेल्या महिला बचत गटांचा सन्मान, 23 जून रोजी लोरे नं. 1 रुजेश्वर उद्यान येथे 12 दिव्यांग विद्यार्थ्यांना फिरायला घेऊन जाणे. असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिली आहे.











