कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. हा ठराव वार्ड क्रमांक ११ च्या नगरसेविका दीपिका जाधव यांनी सभागृहात मांडला. ठराव मांडताना अनुसूचित जाती प्रवर्गाची सामाजिक एकात्मता कायम राहावी, आरक्षणाच्या विद्यमान रचनेमध्ये अंतर्गत विभागणी टाळावी, तसेच उपवर्गीकरणासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यापक सामाजिक चर्चा व वस्तुनिष्ठ अभ्यास व्हावा, असे मुद्दे सभागृहासमोर मांडण्यात आले. नगराध्यक्ष संदेश पारकर तसेच उपस्थित सर्व नगरसेवकांनी या ठरावास मंजुरी दिली. या निर्णयामुळे कणकवली नगरपंचायत सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपवर्गीकरण विरोधात ठराव मंजूर करणारी पहिली नगरपंचायत ठरली. यावेळी सभागृहात मुख्याधिकारी गौरी पाटील, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक लुकेश कांबळे, संकेत नाईक, जयेश धुमाळे, जाई मुरकर, सुमेधा अंधारी तसेच स्वीकृत नगरसेवक सत्यजीत पारकर उपस्थित होते. सभागृहाने शासनाने सर्व संबंधित घटकांची मते जाणून, सविस्तर अभ्यास करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.












