पावसाची रिमझिम आणि बाळ गोपाळांनी उदंड उत्साह उत्साहात फोंडाघाट मध्ये उशिरापर्यंत दहीहंडी फोडल्या!

ग्रामस्थांचे श्रीकृष्णाला निरोपाप्रसंगी गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येण्या साठी प्रार्थना !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कृष्णाच्या लीलावर आधारित भक्तीमय गाण्यांच्या तालावर ” तुझ्या घरात नाही पाणी–” आणि कृष्णाच्या जयघोषात, जल्लोषात फोंडाघाट एसटी स्टँड पासून मारुतीवाडी पर्यन्त च्या हंड्या, बाल गोपाळांच्या एकीतून प्रचंड उत्साहात दुपारी उशिरापर्यंत फोडण्यात आल्या.काही ठिकाणी गोविंदानी पारंपारिक खेळ खेळून रंगत आणली. श्रद्धा, उत्साह, जिद्द, परिश्रम आणि सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी स्पष्ट भूमिका आजची झेन झी – युवा गोविंदा मध्ये दिसून आली. यामध्ये शाळेतील मुला- मुली ची संख्या लक्षणीय होती.. त्यामुळे श्रीकृष्णाला उगवाई नदीवर आरती – प्रार्थना केल्यानंतर, मागणी मागताना, गावचा विकास सुद्धा भ्रष्टाचार विरहित, पारदर्शक आणि गावच्या समस्त अबालबुद्ध नागरिक,युवा- युवतींना समजावून घेऊन, एकत्रितपणे व्हावा. ग्रामस्थांच्या मूलभूत अडचणी समस्या,त्यांना होणारा त्रास यांचा गांभीर्याने विचार करून त्या अग्रक्रमाने सोडवाव्यात संबंधितांनी “माझे गाव, स्वच्छ गाव” ची गांभीर्याने अंमलबजावणी करावी. अशी श्रीकृष्णाकडे प्रार्थना करण्यात आली…

गेले पाच दिवस सुरू असलेल्या बाजारपेठेतील मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यामध्ये रोज सायंकाळी वरवडे गावचे सुप्रसिद्ध किर्तन विशारद महेंद्रपंत मिराशी यांनी स्व.विवेक गोखले यांच्या मार्गावर चालताना सुश्राव्य किर्तन लोकांनी पसंत केले. त्यांनी आपला हिंदू धर्म,त्यांच्या परंपरा आणि शास्त्र यांचा आपल्या निरूपणामध्ये सुंदर मेळ साधला. त्यानंतर फोंडाघाट वारकरी संप्रदायाचा हरिपाठ आणि भजन यांनी चैतन्य आणि भक्तिमय वातावरण तयार केले. ह. भ.प. मारुती मेस्त्री व सहकाऱ्यांनी सुंदर भक्तीगीते सादर करून सर्वांची मने जिंकली. रात्री अनेक स्थानिक भजन मंडळांनी, भजन आणि गजर करत श्रीकृष्ण सेवेचा आनंद लुटला. पूर्वसंध्येला महाआरती होऊन “श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी—” च्या जयघोषात पालखी प्रदक्षिणा उत्साहात पार पडली. सकाळी काल्याचे भजन झाल्यानंतर, महाआरती होऊन दहीहंडी फोडण्याच्या लगबगीला सुरुवात झाली. यावेळी युवा, मुले- मुली यांनी रंगोत्सव साजरा केला. रंगाच्या उधळणीत आणि कृष्णाच्या जयजयकारात, उत्साही गोपाळांनी एका मागून एक हंड्या फोडल्या.. संपूर्ण सोहळ्याचे नियोजन बालगोपाळ मंडळ ,फोंडाघाट आणि फोंडावासीयांनी केले. पंचक्रोशीतील वाड्या- वाड्यावर सुद्धा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम प्रचंड उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. यामध्ये गांगोवाडी गोविंदा पथकाने फोंड्या बाहेर जाऊन दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला…

error: Content is protected !!