जि प मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून शिक्षण संचालकांना पत्रव्यवहार
कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड आणि न्यू इंग्लिश स्कूलचे सहाय्यक शिक्षक संजयकुमार खेमाजी आडे यांच्याविरोधात दहावीच्या परीक्षेतील गैरप्रकाराच्या प्रकरणात तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
उपलब्ध अधिकृत पत्रानुसार, आदर्श विद्यामंदिर भुईबावडा परीक्षा केंद्रावर झालेल्या दहावीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणात दोघांवर दोषारोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळ, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनानुसार विभागीय सचिवांनी संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वैभववाडी यांनी मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड व सहाय्यक शिक्षक संजयकुमार खेमाजी आडे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर दोघांना अनुक्रमे 15 जुलै 2026 आणि 20 जुलै 2026 रोजी रात्री अटक करण्यात आली होती. न्यायालयीन आदेशानुसार त्यांना काही काळ पोलीस व न्यायालयीन कोठडीही भोगावी लागली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
पत्रात नमूद केल्यानुसार, मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक हे 48 तासांपेक्षा अधिक काळ पोलीस व न्यायालयीन कोठडीत राहिल्याने महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावली 1981 मधील नियम 33(5) नुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संस्थेने अद्याप दोन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केलेली नसल्याचे जिल्हा परिषदेच्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही शिक्षकांवर प्रशासकीय स्तरावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केली आहे.












