विद्यार्थी झाले शिक्षक; वायंगणी हायस्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा!

१७ विद्यार्थ्यांनी दिवसभर सांभाळली शिक्षकांसह मुख्याध्यापक, लिपिक व शिपाईपदाची जबाबदारी

आचरा (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी साजरा होणारा शिक्षक दिन वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनीच शिक्षकांच्या भूमिका स्वीकारत संपूर्ण दिवसभर शालेय कामकाजाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

या अभिनव उपक्रमात एकूण १७ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन आपल्या सहकाऱ्यांना विविध विषयांचे अध्यापन केले. कु. लविना सावंत हिने मुख्याध्यापकाची भूमिका प्रभावीपणे पार पाडत शाळेचे कामकाज पाहिले.

शिक्षक दिनाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक डी. जे. टकले यांनी सर्व विद्यार्थी-शिक्षकांना शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षकांच्या भूमिकेत भाग्यश्री सावंत, आर्या जोशी, किरण सावंत, मेघा सावंत, सार्थक पंडित, विपुल सावंत, मंजुनाथ घातले, तुषार पडते, श्रावणी सुर्वे, तन्मयी सावंत, वेदिका सावंत व प्रांजल कदम यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शाळेच्या प्रशासकीय कामकाजातही विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली. हर्षल सावंत याने लिपिकाची, तर साहिल चोडणेकर व योगेश सावंत यांनी शिपाईपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षकवृंद केतकी बावकर, आप सिंग वसावे, अस्मिता मेस्त्री, दयानंद आडे, दुर्वा शिंदे, संजय जाधव, तसेच लिपिक अमेय सावंत व शिपाई अक्षय घाडीगांवकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

‘शिक्षक’ झाल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव अविस्मरणीय!

दिवसभर शिक्षक म्हणून काम केल्यानंतर झालेल्या सांगता समारंभात प्रत्येक विद्यार्थी-शिक्षकाने आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षकाची भूमिका साकारताना आलेले अनुभव, जबाबदारीचे भान आणि अध्यापनातील आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले.

यावेळी प्रशालेत उपस्थित संस्थाध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू, शाळा समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत उर्फ बाबू हजार आणि संस्था खजिनदार ॲड. समृद्धी आसोलकर यांनी विद्यार्थी-शिक्षकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याची आणि जबाबदारीची प्रत्यक्ष जाणीव करून देणारा हा अभिनव उपक्रम ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयासाठी विशेष ठरला. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना, आत्मविश्वासाला आणि शैक्षणिक सहभागाला चालना देणारा हा शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.

error: Content is protected !!