संतोष तांबे यांना ‘गुरुसेवा सन्मान’ पुरस्कार जाहीर

३४ वर्षांच्या शैक्षणिक सेवेसह विविध उपक्रमांची दखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माईण युनिट नं.1 (केंद्र-सावडाव) येथील सेवाभावी आणि विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक संतोष लक्ष्मण तांबे यांना यावर्षीचा नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ चा गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथील आमदार दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील गुणवंत आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा वसंतशेठ केसरकर स्मृती ‘गुरुसेवा सन्मान पुरस्कार’ यंदाही जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे हे सलग तेरावे वर्ष असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

संतोष तांबे यांनी आपल्या 34 वर्षांच्या शैक्षणिक सेवाकालात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण शालेय आणि सहशालेय उपक्रम राबविले आहेत.अनेक स्पर्धा परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ते एक उत्तम लोककलावंत, उत्तम अध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक, कुशल शिक्षक संघटक आणि सेवाभावी कार्यकर्ते आहेत.त्यांच्या समग्र कार्याची दखल घेऊन त्यांना सावंतवाडी येथील नामदार दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर केला आहे.सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

श्री. तांबे यांना जाहीर झालेल्या गूरूसेवा सन्मान पुरस्काराचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!