देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील व वरेरी गावचे प्रसिद्ध आंबा बागायतदार तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेले ज्येष्ठ समाजसेवक विनायक पारकर यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त तळेबाजार येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ६० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या उपक्रमात सहभागी होत संबंधितांनीही रक्तदान केले. त्यापैकी एका रक्तदात्याने आपले ३७ वे रक्तदान पूर्ण केले असून, नियमित रक्तदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
विनायक पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.














