आंबा-काजू नुकसानभरपाई आणि अणुऊर्जा विरोधात जलसमाधी आंदोलन
पोलिसांना चकवा देत आंदोलक उतरले समुद्रात
देवगड (प्रतिनिधी) : आंबा काजू नुकसान भरपाई व अणुऊर्जा प्रकल्प विरोधात मिठमुंबरी बागवडी समुद्रकिनारी 3 जुलै रोजी जलसमाधी आंदोलन पोलिसांच्या अटकावामुळे स्थगित करण्यात आले असले तरी काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून पाण्यात शिरून जलसमाधीचा प्रयत्न केला. पोलिसांनी व शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या विनंतीअंती आंदोलक पाण्याबाहेर आहे. मात्र दहा दिवसांत शासनाने अणुऊर्जा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयासमोर शेतकरी विष प्राशन करून आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंबा काजू बागायतदारांना प्रति कलम पाच हजार रुपये व काजूला प्रति कलम तीन हजार रुपये नुकसान भरपाई मिळायला हवी. तसेच येत्या दहा दिवसांत अणुऊर्जा प्रकल्पाचा सामंजस्य करार रद्द केल्याची माहिती अधिवेशनात सभागृहाला द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार विनायक राऊत, उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख व माजी आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मनसे जिल्हाप्रमुख धीरज परब, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे, शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष आप्पा अनभवणे, प्रकल्प अभ्यासक मंगेश सावंत, आंबा व काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गांवकर, गणेश वाळके, प्रशांत शिंदे, अजय तेली, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गांवकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांना राजू शेट्टी, महादेव जानकर, माजी खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन केले. विनायक राऊत यांनी मालवणी भाषेत गा-हाणे घालून प्रकल्प रद्द व्हावा अशी कोकणातील देवस्थानांना साकडे घातले. मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर हे पहिलेच आंदोलन असल्याने पदाधिकारी जलसमाधी घेतील असे सांगून राजू शेट्टींसह सर्व मान्यवर व पदाधिकारी समुद्राच्या पाण्यात जाण्यासाठी निघाले. यावेळी समुद्राकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी सर्व बाजूंनी कडे केले. तसेच पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी त्यांना रोखले. पाण्याला उधाण आहे. पाण्यात उतरू नये. महिला वर्ग जास्त आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र राजू शेट्टी व आंदोलन कर्ते आक्रमक होते. शेवटी राजू शेट्टी यांनी संयमाची भूमिका घेत आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. मात्र त्यातील आंदोलनकर्ते गणेश गांवकर, काका ढोके, गणेश वाळके. अजय नाणेरकर असे सहा ते सात जण पोलिसांना चकवा देत कडे तोडून पाण्यात शिरले. पाण्यात जाऊन आंदोलन सुरू केले उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी स्पीकर द्वारे विनंती केल्यावर बऱ्याच वेळाने आंदोलन कर्ते पाण्याबाहेर आले.
फोटो- पोलिसांना चकवा देत समुद्रात उतरलेले आंदोलक.















