तळेरेत सर्व्हिस रोडच्या गटाराला पडले भगदाड

महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष

तळेरे (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रोड वरुन वैभववाडी- कोल्हापूर रस्त्यावरील वळणावर रस्त्याखालून गेलेल्या गटारावरती भलेमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे ते पडलेले भगदाड अपघातास कारणीभूत ठरणारे आणि एखाद्याच्या जीवावर बेतणारे ठरणार आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणाला गांभीर्य दिसत नसून त्याठिकाणी अपघात घडल्यास महामार्ग प्राधिकरण सर्वस्वी जबाबदार असेल असा इशारा तळेरे गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण अर्जुन वरुणकर यांनी दिला आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रोड वरुन वैभववाडी- कोल्हापूर रस्त्यावरील अरुंद आणि धोकादायक वळणावरती सर्व्हीस रस्त्याखालून गेलेल्या गटारावरती भलेमोठे भगदाड पडले आहे. पुणे, कोल्हापूर वैभववाडी मार्गे मुंबई गोवा महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची फार मोठी वर्दळ दिवस रात्र चौवीस तास सुरू असते. तळेरे येथून वैभववाडी मार्गे कोल्हापूर हा महामार्ग देखील तळेरे पर्यंत मुंबई गोवा महामार्गाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवासी आणि अवजड वाहनांची वाहतूक सतत सुरू असते. कोल्हापूर मार्गे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाण्यासाठी करुळ-गगनबावडा मार्गे जाणारी बहुतांश वाहने याच महामार्गाने जात येत असतात. परंतु हे दोन्ही महामार्ग तळेरे येथे ज्या ठिकाणी एकत्रितपणे येतात त्याच ठिकाणी अरुंद सर्व्हिस रस्त्यामुळे मोठी अवजड वाहने वळवितांना वाहनचालकांना फार मोठी कसरत करावी लागते. त्याचबरोबर अरुंद सर्व्हिस रस्त्यामुळे तळेरे येथील बंदिस्त उड्डाणपूलामुळे फार मोठी समस्या निर्माण होऊन दोन्ही बाजूला वाहनांची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

हे दोन्ही महामार्ग तळेरे येथे ज्याठिकाणी जोडले जातात तेथेच रस्त्याखालून बांधण्यात आलेल्या गटाला वरती सुरूवातीला लहानसा खड्डा पडला होता. परंतु वळणावरती हा खड्डा पडलेला असून सततची अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावरती वर्दळ सुरू असल्याने सदरचा खड्डा मोठा होत जाऊन त्याचे रुपांतर आता मोठ्या भगदाडात झाले आहे. त्यावरती दगड टाकून ठेवण्यात आले होते. परंतु टाकलेले दगड सततच्या अवजड वाहनांनी खाली दबले गेले असून ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी रस्त्यावरुनच वाहत असल्याने सदरचा खड्डा वाहत्या पाण्यामुळे वाहनचालकांना दिसण्यात येत नसल्याने त्या खड्डयात येणाऱा जाणाऱा मोटरसायकल स्वार किंवा येणारी जाणारी वाहने त्या भगदाडात अडकून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच तेथील वळणावरील रस्त्या देखील खचला आहे. त्यामुळे ते अरुंद वळण धोकादायक आणि अपघातास कारणीभूत ठरणारे बनले आहे.

महामार्ग प्राधिकरणाने याबाबत तातडीने हालचाल करुन अरुंद रस्ता रुंद करून तसेच वळण रस्त्यावरती पडलेले भगदाड कायमस्वरूपी बुजविण्यात यावे अन्यथा ग्रामस्थासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा तळेरे गावचे माजी सरपंच आणि राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण अर्जुन वरुणकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!