कोल्हापुरात मुसळधार पाऊस
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासांत एकूण सरासरी 52.8 मि.मी. पर्जन्यमान नोंदविण्यात आले. तालुकानिहाय पर्जन्यमानामध्ये गगनबावडा (143.1 मि.मी.) येथे सर्वाधिक पाऊस झाला असून, त्यापाठोपाठ आजरा (67.6 मि.मी.), चंदगड (65.3 मि.मी.), कागल (60.2 मि.मी.), भुदरगड (85.9 मि.मी.), पन्हाळा (58.3 मि.मी.), शाहूवाडी (46.9 मि.मी.), गडहिंग्लज (43.4 मि.मी.), करवीर (40.1 मि.मी.), राधानगरी (81 मि.मी.), हातकणंगले (20.9 मि.मी.) व शिरोळ (16.8 मि.मी.) असा पाऊस नोंदविण्यात आला आहे.
सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. मात्र अतिवृष्टीमुळे 2 राज्यमार्ग, 2 प्रमुख जिल्हा मार्ग, 2 ग्रामीण मार्ग आणि 1 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 7 रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणीपातळी 28 फूट 3 इंच, शिरोळ बंधारा येथे 36 फूट आणि नृसिंहवाडी येथे 31 फूट असून तिन्ही ठिकाणी नदीची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा खाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सध्या कोणताही तातडीचा पूरधोका निर्माण झालेला नाही.
जिल्ह्यातील 299 बंधाऱ्यांपैकी 31 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणामध्ये 32 टक्के पाणीसाठा असून धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. तुळशी धरणात 38 टक्के, वारणा धरणात 24 टक्के आणि दूधगंगा धरणात 8 टक्के पाणीसाठा आहे. वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी 100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात आजअखेर कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची आवश्यकता भासलेली नाही. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.












