सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गुणवत्तायादीत तिन्ही विद्यार्थ्यांचा गौरव
तळेरे (प्रतिनिधी) : इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, तळेरे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गुणवत्तायादीत तीन विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे.शाळेची विद्यार्थिनी कु. काव्या सदानंद तळेकर हिने जिल्हा गुणवत्तायादीत दुसरा क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे. तसेच कु.श्रीकृष्ण मंगेश दहिफळे याने जिल्हा गुणवत्तायादीत चौथा क्रमांक मिळविला. ग्रामीण शिष्यवृत्ती गुणवत्तायादीत कु. माही अजित जोईल हिने १३वा क्रमांक संपादन केला आहे.
या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा देवकी तळेकर व सर्व सदस्य, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे उल्लेखनीय यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.












