कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने ‘पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळा ; स्पर्धात्मक विभाग टिकण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधा
कणकवली (प्रतिनिधी) : पत्रकार अहोरात्र समाजासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. समाजाला वेळ देताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीतही पत्रकारांच्या मुलांनी जिद्दीने अभ्यासात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रातही गरुडझेप घ्यावी, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी येथे केले.
कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके,उपाध्यक्ष संतोष राऊळ, ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, अशोक करंबेळकर, खजिनदार रोशन तांबे, माजी अध्यक्ष चंद्रशेखर देसाई , अजित सावंत, रमेश जोगळे, सुधीर राणे, विरेंद्र चिंदरकर , भाई चव्हाण, उपाध्यक्ष नंदू कोरगावकर , नितीन कदम , उमेश बुचडे , सचिन राणे , सहसचिव दर्शन सावंत, योगेश गोडवे, राजन चव्हाण , विनय सावंत, रंजिता तहसिलदार , उत्तम सावंत, संजय बाणे , हेमंत वारंग , मिलींद डोंगरे , किरण खाजनवाडकर, भास्कर रासम , संजय पेटकर, मंगेश साळस्कर, सुधीर जोशी , रमाकांत बाणे आदींसह कणकवली तालुक्यातील पत्रकार व पत्रकारांचे पाल्य उपस्थित होते.
उमेश तोरसकर म्हणाले, आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. वाचनामुळे समाजाचे आकलन वाढते. तसेच, केवळ नोकरीच्या मागे न धावता व्यवसायातही उतरले पाहिजे. नोकरीपेक्षा व्यवसायात आर्थिक समृद्धी जलद गतीने मिळते, त्यामुळे मराठी मुलांनी उद्योग-व्यवसायात नाव कमवावे. तसेच बदलत्या पत्रकारितेत काम करताना कणकवली तालुका संघ नेहमीच जिल्हा संघात अध्यक्ष भगवान लोके यांच्या सातत्यपूर्वक उपक्रमामुळे अग्रेसर आहे. पत्रकार संघाने नेहमीच चांगले उपक्रम राबविले आहेत.
गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले, “सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी पुरेशा अकॅडमी उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. हे चित्र बदलण्यासाठी आणि सिंधुदुर्गातच स्पर्धा परीक्षांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. मोठ्या शहरांमधील अकॅडमीमध्ये ज्या दर्जेदार पद्धतीचे शिक्षण दिले जाते, तेच शिक्षण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर मिळाले पाहिजे. मी देखील छोट्या पदावर काम करत करत गटविकास अधिकारी पदापर्यंत पोहोचलो आहे. त्यामागे जिद्द आणि चिकाटी आणि कष्ट आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात छोटी नोकरी पकडून स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तम यश संपादन करावे. आजच्या डिजिटल युगात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी ‘एआय’ चा सुयोग्य आणि सकारात्मक वापर करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
संतोष राऊळ म्हणाले, पत्रकारांच्या मुलांनी आदर्श घडण्यासाठी प्रयत्न करावेत.कणकवली तालुका पत्रकार संघाचे काम जिल्ह्यात आदर्शवत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष भगवान लोके म्हणाले, समाजातील विविध घटकांकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नेहमीच होतो, पण आपल्याच सहकाऱ्यांच्या मुलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. पत्रकार म्हणून समाजात वावरताना आम्ही पाल्य म्हणून तुम्हाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, तरीही तुमच्या कष्टाने तुम्ही हे यश मिळवले आहे. भविष्यात वडिलांपेक्षा अधिक सक्षम अधिकारी आणि उद्योजक बनून तुम्ही समाजामध्ये उज्जवल नावलौकीक करा. पत्रकार संघ म्हणून नेहमी पत्रकारांच्या पाल्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहू , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात पत्रकार पाल्यांना भेटवस्तु , सन्मानपत्र , गुलाब पुष्प देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सुत्रसंचालन अजित सावंत तर आभार उमेश बुचडे यांनी मानले.












