भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून उपक्रम; जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते शुभारंभ
बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातील अंगणवाडी ते जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला इन्सुली येथील सर्व शाळांमध्ये साहित्य वाटप केल्यानंतर आज निगुडे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २ तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरे वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नारायण नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रशांत कांदे सर यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ म्हणाले, “विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पुस्तके व दप्तरांचे वेळेवर वाटप झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होईल. प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावा, यासाठी जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी या साहित्याचा योग्य उपयोग करून मन लावून शिक्षण घ्यावे, तसेच पालकांनीही मुलांना नियमित शाळेत पाठवून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे तसेच सरपंच सेवा संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष व कास गावचे सरपंच प्रवीण पंडित यांनीही विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश गावडे, निगुडेचे माजी सरपंच समीर गावडे, माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, शिक्षक प्रशांत कांदे, हेमंत सावंत, बाबुराव धुरी, शिक्षिका प्रांजल देसाई , कुसाजी मेस्त्री, अंगणवाडी सेविका रंजना सावंत, मदतनीस शिरसाठ, शिक्षण समिती सदस्य संतोष राणे, किशोर जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक नारायण नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.











