खारेपाटण (प्रतिनिधी) : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या सर्वत्र मतदार याद्यांचे अपडेट तथा पुनर्निरीक्षण चे काम जोरदार सुरू असून याकरिता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बी एल ओ चे काम दिल्यामुळे त्यांना नागरिकांच्या घरोघरी जाऊन सर्व्हे करावा लागत आहे. परिणामी शिक्षक हे शालेय अध्यापन सोडून मतदार यादी अपडेट करण्याच्या कामात सध्या व्यस्त असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण ? असा सवाल आता पालक व ग्रामस्थांमधून केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षाचे सत्र हे १५ जून २०२६ पासून सुरू झाले असून पहिले तीन महिने शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने व शाळेची नवी घडी बस पर्यंत अत्यंत महत्वाचे असतात. अशा वेळी प्राथमिक शिक्षकांना शाळा बाह्य कामे देऊन शासन विद्यार्थ्यांचे नुकसान करत असून “तुम्हाला जर शिक्षक निवडणूक कामासाठीच वापरायचे असतील तर त्या शाळांना पर्यायी शिक्षक उपलब्ध करून द्या.अन्यथा ही अतिरिक्त कामे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दीर्घ शालेय सुट्टी दरम्यान करून घ्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.व शिक्षक देखील द्विधा अवस्थेत राहणार नाहीत.
दरम्यान शासनाचा मतदार यादी पुनर्निरीक्षण हा विशेष उपक्रम सुमारे १ महिना चालणार असून शिक्षकांना त्यांचा रोजच्या कामाचा अहवाला शासनाला द्यावा लागत आहे.व ऑनलाइन माहिती देखील भरावी लागत आहे.यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेत शिकवायचे काम करायचे की, मतदाराच्या घरी जाऊन मतदार यादी अपडेट करण्याचे काम करायचे ? असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत.
शासनाने याबाबत तातडीने उपाय योजना करून शिक्षकांची बी एल ओ कामातून मुक्तता करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी केली आहे.











