शासकीय वैद्यकिय महाविद्यालय ओरोस येथे मणक्याचे मोफत तपासणी शिबीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दु.१.०० या वेळेमध्ये ग्रामीण भागातील रूग्णांच्या मणक्याचे मोफत तपासणी शिबीर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, ओरोस येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कॅम्पमधून सुचविलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रिया या ८ ऑगस्टला ओरोस येथे करण्यात येणार आहे.

दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई ही संस्था मणक्याच्या आजाराची मोफत तपासणी व शस्त्रक्रिया करणारी नामांकित संस्था असून जगप्रसिध्द निष्णात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ३० वर्षे काम करत आहेत. सिंधुदुर्गातील या संस्थेमार्फत आतापर्यंत ४ शिबीरे यशस्वीपणे राबविण्यात आलेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा ग्रामीण व डोंगराळ असून रुग्णांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. मणक्याच्या शस्त्रक्रिया या अत्यंत गुंतागुंतीच्या व नाजुक असल्यामुळे त्यांचा खर्चही सर्वसामान्यांना परवडणारा नसतो. एका मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी साधारणतः ८ ते ९ लाख रूपये खर्च अपेक्षित असतो. स्पाईन फाऊंडेशन मुंबई ही सामाजिक संस्था असून या संस्थेमध्ये साधारणतः ५० निष्णात स्पाईन सर्जन असून या सर्वांच्या माध्यमातून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सेवा देत आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारी व सौराष्ट्रापासून आसामपर्यंत वेगवेगळ्या सेंटरमार्फत रूग्णांची तपासणी करून मणक्याच्या शस्त्रक्रिया सुचविलेल्या रुग्णांची त्याच ठिकाणी स्वखर्चाने जाऊन शस्त्रक्रिया करत आहेत.

आपल्या सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई व उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आतापर्यंत २७ रूग्णांच्या मोफत सर्जरी करण्यात आल्या. विशेष म्हणजे एकाच वेळी २ रूग्णांच्या मानेचा मणका व कंबरेचा मणका अशा शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या.

तरी कृपया सिंधुदुर्ग जिल्हयातील जे रुग्ण मानेच्या व कंबरेच्या मणक्याच्या आजाराने त्रस्त आहेत अशा रूग्णांनी सदर कॅम्पला श्री. रोशन कुळे, मोबा. ७०४५८१४३४१ व श्रीम. वैशाली ओटानेकर, मोबा.९८८१८८६६०६ यांच्याशी संपर्क साधून रूग्ण नाव नोंदणी करायची आहे. असे आवाहन दि स्पाईन फाऊंडेशन मुंबई मार्फत डॉ. प्रणित पावसकर, डॉ. विजय वाघमारे – विभागप्रमुख (HOD), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग
डॉ. अनंत दवंगे – अधिष्ठाता (डीन), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे.

error: Content is protected !!