(ब्युरो न्युज) : कर्नाटकात काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. भाजपकडून अनेक राज्यात फोडाफोडी करुन राज्ये आपल्या हातात घेतली. फोडाफोडी आणि खोक्याचं राजकारण कर्नाटकच्या लोकांना आवडलेले नाही, असा भाजपवर हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चढवला. कर्नाटकचं चित्र देशभर दिसेल, असा दावा पवार यांनी यावेळी केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पवार यांनी कर्नाटकमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनाही शरद पवार यांनी टार्गेट केले. अलिकडच्या काळात भाजपकडून इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यात आमदार फोडून सत्ता आपल्याकडे घेतली आहे. त्यासाठी सत्तेचा वापर करणे हे सूत्र वापरलं आहे. कर्नाटकातही त्यांनी हेच केले. महाराष्ट्रात जे एकनाथ शिंदे यांनी केले, तेच तिथे झाले. तेच मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या बाबतीत केले. गोव्यातही भाजपला बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतले. ही एक नवीन पद्धत साधन संपत्तीचा वापर करुन राबवली जात आहे. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे फोडाफोडी, खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये दिसले आहे, असे पवार म्हणाले. तसेच कर्नाटकप्रमाणे देशातही भाजपला धडा शिकवला जाईल असं पवार म्हणाले. बहुतांश राज्यात भाजप सत्तेबाहेर जात आहे, भाजपचा सपशेल पराभव झालाय, असं पवार म्हणाले.











