गिरीजा राऊत प्रकरणाची सखोल चौकशी करा; महिलेला न्याय द्या – भाजप महिला मोर्चाची मागणी

गिरीजा राऊत प्रकरणावर भाजप महिला मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : माजी खासदार विनायक राऊत तसेच नगरसेवक गिरीश राऊत यांनी सौ. गिरीजा राऊत यांच्याशी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत या घटनेचा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महिलेला न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी दिली.

सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस आदिती सावंत, जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील आणि सुप्रिया वालावलकर उपस्थित होत्या. श्वेता कोरगावकर म्हणाल्या, राज्यात महिलांच्या सन्मानासाठी शासन विविध योजना राबवत असताना एका महिलेला कथितपणे अमानुष वागणूक दिली गेल्याचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. संबंधित महिलेवर जादूटोणा व अघोरी प्रकार केल्याचे आरोपही समोर आले असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असल्याने या प्रकरणात कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री नितेश राणे यांनीही जिल्ह्यात जादूटोणा, अघोरी प्रकार किंवा भोंदूगिरीसारख्या प्रकारांबाबत तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती चौकशी व कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महिला ही कुटुंबासह समाजाचा आधारस्तंभ असून तिच्यावर होणारा कोणताही अन्याय हा समाजावरील अन्याय आहे. महिलांवरील शारीरिक, मानसिक व आर्थिक अत्याचार तसेच अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी समाजाने एकत्रितपणे पुढे येण्याची गरज असल्याचेही कोरगावकर यांनी सांगितले. टीप: या बातमीत नमूद केलेले अमानुष वागणूक, जादूटोणा किंवा अघोरी प्रकार यासंदर्भातील उल्लेख हे पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप व मागण्या आहेत. संबंधित आरोपांवर अधिकृत चौकशी अथवा न्यायालयीन निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.

error: Content is protected !!