फोंडाघाटात कठडा तोडून फॉर्च्युनर कार ३०० फूट खोल दरीत !
जीवित हानी नाही !मात्र गाडीचे नुकसान
फोंडाघाट गांगोवाडी रेस्क्यू टीमचे धाडसी कार्य ! अपघातग्रस्तांना धीर
फोंडाघाट (प्रतिनिधी) : रविवारी संध्याकाळी सुमारे ६:१५ च्या दरम्यान टॉवर जवळ, फोंड्याच्या घाटात वेगाने दाजीपूर वरून येणारी, फॉर्च्युनर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. आणि कठडा – पॅराफीट तोडून कार तब्बल ३०० फूट खोल दरीत कोसळली. (काळ आला होता, पण वेळ नव्हती.) त्याप्रमाणे सुदैवाने कोणतीही जीवित हानी अथवा गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे खूप नुकसान झाले आहे. गाडीमध्ये कणकवली येथील विशाल सावडावकर , विराज ढेकणे, अथर्व घाडीगावकर, संकेत डोईफोडे, कुणाल प्रभुदेसाई इत्यादी पाच जण होते असे समजते. या गाडीच्या पाठोपाठ त्यांच्यासोबत एका गाडीतून महिला, मुली, मुले प्रवास करणारी गाडी होती. अपघाताची माहिती मिळताच चेक पोस्ट वरील पोलीस कॉन्स्टेबल गोरे आणि स्थानिक ग्रामस्थांसह, गांगोवाडी युवा रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून, गाडीतील लोकांना धीर दिला. मात्र तोपर्यंत अंधार पडू लागला होता. खाली दरीत मोबाईलचे आवाज येत होते.
फोंडाघाटच्या गांगोवाडीतील युवा रेस्क्यू टीमने धैर्याने दरीत उतरून काळोखाची पर्वा न करता आपल्याकडील मोबाईलच्या उजेडात, वाजणारे मातीतील गाडलेले मोबाईल यांचा शोध घेऊन अपघातग्रस्त महिला-पुरुषांना दिले. या धाडसी शोधकार्यात पंचायत समिती सदस्य पवन भालेकर, शुभम सावंत, प्रणय भालेकर, निमिश सावंत,दीपक भालेकर, सुयश भालेकर, शुभम दीपक सावंत, अनिकेत सावंत, मंदार जोईन, ग्रामपंचायत सदस्य अमित चव्हाण इत्यादींनी सहभाग घेतला. रात्री उशिरा अपघात ठिकाणी थांबलेले महिला- पुरुष, मुले- मुली कणकवली कडे रवाना झाली. या अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद झालेली नाही. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. तरीही घाटात फेसाळणारे धबधबे प्रवाही झाल्याने आणि त्या ठिकाणी असलेली विकृत प्रवृत्ती यावर निगराणीसाठी, पावसाळ्यात पोलिसांची गस्त आवश्यक असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.


















