कणकवलीतील विकासकामांच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी 14 जुलै रोजी आपल्या वाढदिवशी केले. मात्र शहरातील टेम्बवाडी येथील नवीन रस्त्यास सोलर लाईट बसविणे आणि कांदळकर घर ते कला महाविद्यालय दरम्यान दुतर्फा गटार बनविणे या कामांचेही नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भूमिपूजन केले. मात्र या कामांसाठी भाजपा नेते पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन मधून निधी मंजूर केला असल्याचे बॅनर भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे यांनी लावले होते. टेम्बवाडी नवीन रस्त्यालगत सौर पथदीप साठी 10 लाख आणि कांदळकर घर ते कला महाविद्यालय दुतर्फा गटार बनविण्यासाठी 29 लाख रुपयांचा निधी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन मधून मंजूर केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्र्यांचे आभार अशा मजकुराचे बॅनर सागर राणे यांनी लावले होते. भाजपा युवा मोर्चा कणकवली शहराध्यक्ष सागर राणे यांनी लावलेल्या त्या बॅनर मुळे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केलेल्या भूमिपूजनाच्या विकासकामांना निधी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला असून त्यावरून श्रेयवाद रंगल्याचे दिसून येत होते.













