भुईबावडा कॉपी प्रकरण; प्रमुख संशयित संजय राठोड पोलीस ठाण्यात हजर

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील गाजलेल्या कॉपी प्रकरणातील प्रमुख संशयित संजय कणिराम राठोड याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्यानंतर तो बुधवारी सकाळी वैभववाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. सायंकाळपर्यंत त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित संजयकुमार आडे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

भुईबावडा येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान झालेल्या कथित कॉपी प्रकरणी उंबर्डे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय कणिराम राठोड, न्यू इंग्लिश स्कूल, हेत येथील सहाय्यक शिक्षक संजयकुमार आडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ जून रोजी वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होऊन तब्बल २३ दिवस उलटूनही संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची तालुकाभर चर्चा सुरू होती. दरम्यान, प्रमुख संशयित संजय राठोड यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळल्याने बुधवारी सकाळी राठोड वैभववाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली असून त्याला अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, या प्रकरणातील दुसरा संशयित संजयकुमार आडे अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. राठोड चौकशीसाठी हजर झाल्यामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून जिल्हाभर गाजलेल्या या कॉपी प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!