पुस्तक म्हणजे समाजमानसाशी सुखसंवाद : मयूर सावकार

मेधा जाधव पारधीये यांच्या ‘हसऱ्या जखमा’ कवितासंग्रहाचे म्हापशात प्रकाशन

म्हापसा (प्रतिनिधी) : एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे केवळ छापील पानांचे अनावरण अथवा लोकार्पण नव्हे, तर संबंधित लेखकाच्या अथवा कवीच्या भावनाविष्कार तसेच त्याच्या विचारांचा समाजमानसाशी घडणारा सुखसंवाद असतो. स्वत:ची कल्पनाशक्ती, अनुभव, विचारांचे परिपोषण यांच्या बळावर वाचकांसमोर अशी अभिव्यक्ती होत असते, असे प्रतिपादन म्हापसा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा केंद्र सरकारच्या प्रशासनातील सेवानिवृत्त अधिकारी मयूर सावकार यांनी केले.

मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि आता म्हापसा येथील कवयित्री मेधा जाधव पारधीये यांच्या ‘हसऱ्या जखमा’ कवितासंग्रहाचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी या नात्याने प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. हा कार्यक्रम ‘कोकण मराठी परिषद, गोवा’ तर्फे दत्तवाडी-म्हापसा येथील इंद्रधनुष्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

‘हसऱ्या जखमा’ या मराठी कवितासंग्रहाच्या लेखनकर्त्या तथा ‘कोमप, गोवा’च्या कार्यवाह मेधा जाधव, ‘कोमप, गोवा’चे अध्यक्ष सुदेश आर्लेकर, प्रमुख वक्ता साहित्यिक गौरीश नाईक, कार्यक्रमाच्या अध्यक्ष धुळेर-म्हापसा येथील साहित्यिक तथा सर्जनशील रांगोळी कलाकार आरती टोपले, विशेष निमंत्रित म्हापसा येथील साहित्यिक रेखा पोकळे, विशेष निमंत्रित आसगाव-बार्देश येथील मेकअप आर्टिस्ट तथा ब्यूटिशियन प्रिया राजेश नाईक, कार्यक्रमाचे संयोजक करासवाडा-म्हापसा येथील नाट्यकलाकार मिथिलेश बांदेकर, नाट्यकलाकार तथा सूत्रनिवेदक योगीश जोशी यांची या वेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

मयूर सावकार ह्यांनी इतर मान्यवरांसमवेत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्‍घाटन केले व त्यानंतर त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमात मेधा जाधव यांनी पुस्तकातील निवडक कवितांचे सादरीकरण तसेच प्रेक्षकांच्या विनंतीनुसार कोकणी काताराचे गायन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून बोलताना आरती टोपले यांनी ‘हसऱ्या जखमा’ हा कवितासंग्रह मेधा जाधव यांच्या संवेदनशील मनाचा व साहित्यनिष्ठेचा सुंदर आविष्कार असल्याचे सांगितले. त्यातील प्रत्येक कविता वाचकांना नवी ऊर्जा देईल व साहित्यप्रेम अधिकाधिक वृद्धिंगत करील, असे मतही त्यांनी व्यक्त केला.

प्रमुख वक्ते गौरीश नाईक या वेळी म्हणाले, कविता ही केवळ वाचण्याचीच नव्हे, तर अनुभवण्याची कला आहे. कवी हा समाजाच्या भावना, वेदना, संघर्ष व आशाअपेक्षांचा दुवा आहे. तंत्रज्ञानाच्या युगात माणूस अधिकाधिक एकाकी होत असताना कविता त्यांना स्वत:शी संवाद साधण्याची संधी देत असते.

कामुर्ली येथे वास्तव्य असलेली एक बालिका नुष्का कुलदीप टिकम हिने प्रारंभी ‘त्रिशुल तांडव’ हे भरतनाट्यम शैलीतील प्रार्थनापर नृत्य सादर केले. सुदेश आर्लेकर यांनी प्रास्ताविक तसेच स्वागतपर भाषण केल्यानंतर प्रतीक्षा आरोलकर यांनी ग्रंथभेट व गुलाबाच्या रोपट्यांच्या कुंड्या देऊन व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले.

नामवंत मिमिक्री आर्टिस्ट तथा नाट्यकलाकार श्रीकांत साळगावकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या अखेरीस ‘कोकण मराठी परिषद, गोवा’चे सक्रिय कार्यकर्ते दीपेश नाईक यांनी आभारप्रकटन केले. योगीश जोशी यांनी सूत्रनिवेदन केले.

error: Content is protected !!