फोंडाघाट (प्रतिनिधी) : नूतन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, कार्यकारी मंडळाची सभा तसेच महाविद्यालयाच्या विकास समितीमध्ये आवश्यक ती परवानगी न घेता, विद्यार्थ्यांच्या जमा फी रकमेतून खोटी माहिती देऊन सदरचे बांधकाम करण्याचा मनमानी घाट घालून घाईघाईत भूमिपूजन करण्याचे विद्यमान संचालक मंडळातील काही प्रमुख संचालकांनी ठरविल्याच्या विरोधात माजी चेअरमन संजू आपटे यांनी सुरू केलेले लाक्षणिक उपोषण २२ जुलै रोजी संयुक्त सभा घेण्याच्या मागणी पूर्ततेवर अवघ्या दोन तासात मागे घेण्यात आले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमान संचालक मंडळापैकी काही संचालक वगळता या संचालक मंडळांनी नॅक कमिटीच्या शिफारसी चे कारण पुढे करत विद्यार्थ्यांच्या जमा फी रकमेतून इमारत बांधण्याचे ठरवून त्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम इतर संचालक मंडळ व सदस्यांना अंधारात ठेवून घाईघाईत दोन दिवसापूर्वी १५ जुलै ला करण्याचे ठरविल्यानंतर विरोधक संचालक तसेच माजी चेअरमन संजू आपटे यांनी नेक ने इन्फ्रास्ट्रक्चर बाबी पूर्ण करावेत असा शेरा दिला असून त्यात वर्ग खोल्यांची बाब नाही.या शेऱ्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा, मुलींसाठी स्वच्छतागृह, आयटी लॅब इत्यादी सारख्या बाबी नोंदल्या आहेत. मात्र पुरेशा खोल्या असताना सुद्धा तसेच केवळ ५०० विद्यार्थी संख्या असताना नव्या खोल्या बांधून जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाखो रुपयांच्या फी वर डल्ला मारणार का ? विद्यार्थ्यांची जमा रक्कम विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठीच खर्च झाली पाहिजे.खोल्या बांधण्यासाठी कार्यकारिणीने स्वतः निधी उभा केला पाहिजे व लाखो रुपये खर्च करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला विश्वस्त मंडळाला नाही. त्याला सर्वसाधारण समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. असे प्रश्न उपस्थित करत लाक्षणिक उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला मोहन अनंत मोदी, जगदीश पांडुरंग तायशेटे, चिन्मय रुपेश बागवे, विजय गोविंद हळदीवे, जि. प. सदस्य तथा विद्यमान संचालक राजन चिके, केदार अनिल रेवडेकर, श्रीकृष्ण दामोदर तावडे, मनोज रेवडेकर,अनंत सापळे, राजेश कृष्णा शिरोडकर आदी सभासदांनी पाठिंबा दर्शवीला होता.
दरम्यान फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी च्या संचालक मंडळाकडून नूतन इमारत वास्तूचे भूमिपूजन कार्यक्रम आटपल्यानंतर उपोषणकर्ते माझी चेअरमन संजू आपटे, राजन चिके, मनीष गांधी, भाई तावडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी व उपोषण कर्त्यांना समजावण्यासाठी संस्था चेअरमन राजू पटेल, सेक्रेटरी शेखर लींग्रस,खजिनदार आनंद मर्ये, संचालक संजय आंग्रे,विठोबा तायशेटे, संदेश पटेल, ग्रामस्थ तथा माजी संचालक बाळुशेठ डोर्ले,आदी सर्वजण गेले असता उपोषकर्त्यांनी संस्थेचालकांना मनमानी कारभारा विरोधात जाब विचारून नूतन इमारतवास्तू साठी खर्च करावयाचा निधी संयुक्त बैठक लावून सर्व संमती ने करावा अशी मागणी करताच. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजू पटेल यांनी उपोषणकर्त्याची मागणी मान्य करत दिनांक २२ जुलै रोजी संयुक्त बैठक लावण्याचे पत्र उपोषण करताना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.











