कै.नारायण लक्ष्मण आपटे पुरस्काराने मयुरी सावंत व कोमल सुर्वे यांचा सन्मान

कनेडी हायस्कूलचे उज्ज्वल यश

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी यांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. याचबरोबर कु. मयुरी महेश सावंत आणि कु. कोमल संजय सुर्वे यांनी संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून विशेष मानाचा बहुमान मिळविला.

या उल्लेखनीय यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनींना कै. नारायण लक्ष्मण आपटे स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती उषःप्रभा नारायण आपटे पुरस्कृत संस्कृत विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये ₹५०० रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छाचा समावेश होता.

यावेळी प्रा. प्रदीप ढवळ म्हणाले, “संस्कृत आहे तर संस्कृती आहे. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा असून ती प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. कनेडीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवणे ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे.”

संस्कृत विषयात अथर्व गंगाराम तांबे आणि कु. रिद्धी रविकांत पेंडुरकर यांनी ९९ गुण मिळविले. तसेच कु. आर्या प्रदीप सावंत (९७), कु. कृपा अनिल पेडणेकर (९७), कु. दिव्या रेश्मा मेस्त्री (९६), हर्ष दर्शन म्हापसेकर (९४), कु. तनिष्का बाळकृष्ण सांगवेकर (९४), कु. गुंजन गोपाळ पारकर (९४), कु. प्राची महाबळेश्वर देसाई (९२) आणि कु. वल्लरी निलेश राणे यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. संस्कृत विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविल्याची उल्लेखनीय कामगिरी प्रशालेने नोंदवली.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, सर्व संचालक, शालेय समितीचे अध्यक्ष आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचे शिक्षक मकरंद आपटे यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!